इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकः नाशिक लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा कायम आहे. माघारीबद्दल नाराज नाही, असे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी, आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी आमच्याकडे अनेक उमेदवार असून, नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम आहे.
आज नाशिकची जागा भुजबळ यांनी लढावी, असा ठराव समता परिषद आणि ओबीसी संघटनांनी केला. ओबीसी संघटनेने तर आक्रमक पवित्रा घेतला होता. महिलांनी भुजबळ यांना आग्रह केला. त्यानंतर भुजबळ म्हणाले, नाशिकची निवडणूक लढण्याचा महिलांचा आग्रह आहे. त्यांचे म्हणणे मी ऐकून घेतले. मी नाराज नाही. आयुष्यात काही गोष्टी येतात. काही जातात. ‘जो मिल गया उसको मुकद्दर समझ लिया जो खो गया उसिको भुलाता चला गया’ अशा शब्दांत त्यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या.
समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा मी आदर करतो; मात्र आता मी निर्णय घेतला आहे. आयुष्यात एकदाच तिकीट मागितले. त्यानंतर तिकीट मागण्याची वेळ आली नाही. या वेळी दिल्लीतून सांगितल्याने मी तयारीला लागलो होतो; मात्र त्यांच्या काही अडचणी असतील. त्यामुळे नाशिकचा तिढा सुटत नाही, असे त्यांनी सांगितले. आमचा नाशिकच्या जागेवरचा दावा कायम आहे. आमच्याकडे खूप उमेदवार तयार आहेत; मात्र कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय लवकर झाला पाहिजे. भाजप आणि शिंदेंकडेदेखील अनेक उमेदवार आहेत. महायुतीचा कार्यकर्ता म्हणून मी कोणीही उमेदवार दिला, तरी प्रचार करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.