नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील शाहू महाराज पथ भागात मालकाच्या अनुपस्थीत नोकराने हॉटेलमधील गल्यावर डल्ला मारल्याची घटना घडली. या घटनेत गल्यातील २५ हजाराची रोकड भामट्याने लांबविली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विराज प्रधान असे गल्यातील रोकडवर डल्ला मारणा-या संशयित कामगाराचे नाव आहे. याबाबत राजेश बबन घुगे (रा.कोटमगाव ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. घुगे यांचे शाहू महाराज पथ येथील श्रीमान बाबजी टॉवर या इमारतीत रेस्टॉरंट आहे.
रविवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास घुगे कामानिमित्त हॉटेल बाहेर पडले असता भामट्यांने संधी साधली. मालक हॉटेलमध्ये नसल्याची संधी साधत विश्वासू असलेल्या भामट्या कामगाराने काऊंटरच्या गल्यातील सुमारे २५ हजाराची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.