मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पर्यटन विभागाच्या खात्यातूनही ६७ लाख रुपये चोरीला गेल्याच्या घटनेला महिला उलटत नाही तोच आता शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल ४७ लाख ६० हजार चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली. शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात ४७ लाख ६० हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभागात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर जमा झाल्याचे तपासात उघड झाले आहे. पण, हे चौघे कोण आहेत याचा पोलिस तपास करीत आहेत. मंत्रालयातील बँकेतून ही रक्कम चोरीला गेली आहे. ज्या आरोपीच्या खात्यात ही रक्कम गेली आहे, ती सर्व खाती कोलकाता येथील आहे.
एकुणच या दोन घटनामुळे शासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. तब्बल एक कोटीहून अधिक रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार धक्कादायक आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन नेमकं घडलं काय याचा शोध घेण्याची जबबादारी आता पोलिसांवर आली आहे.