नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सायबर भामट्यांनी शहरातील चार जणांना तब्बल ६६ लाखास ब्रोकर असल्याचे भासवून गंडा घातला आहे. शेअर मार्केट मधील गुंतवणुकीतून जास्तीच्या मोबदल्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत गोविंद वाघ (६१ रा.सप्तशृंगी कॉलनी,गंगापूररोड ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सेवानिवृत्त असलेल्या वाघ यांच्याशी जानेवारी महिन्यात भामट्यांनी संपर्क साधला होता. यावेळी ब्रोकर असल्याचे भासवून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास मोठा फायदा होईल असे आमिष दाखविण्यात आले. अल्पावधीत दामदुप्पटसह विविध योजनांची माहिती देण्यात आल्याने वाघ यांचाही विश्वास बसला. त्यानंतर भामट्यांनी त्यांना वेगवेगळया बँक खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडले.
याच प्रकारे अन्य तीन गुंतवणुकदारांचीही फसवणुक करण्यात आली असून तीन महिने उलटूनही गुंतवणुकीच्या रक्कमसह जास्तीचा मोबदला पदरात न पडल्याने वाघ यांच्यासह तीन गुंतवणुकदारानी पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघाना भामट्यांनी तब्बल ६५ लाख ७६ हजार रूपयांना गंडविले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.