नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संत गाडगे महाराज मठाच्या भिंतीजवळ मित्रानेच मित्राचा शुल्लक कारणातून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोटरसायकल दुरुस्तीचे राहिलेले पैसे मागितल्याच्या कारणातून ही घटना घडली. या प्रकरणी तरुणासह त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिंधू सुरेश सावंत (६६) रा. यशवंत बंगला, नाशिक-पुणे रोड, शिवाजीनगर यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आरोपी मयूर कदम व मयत सचिन सावंत हे एकत्र काम करायचे. सचिनने मयूरच्या गाडी दुरुस्तीसाठी ९ हजार रुपये खर्च केले होते व ती गाडी तोच वापरत होता. उर्वरित ४ हजार ५०० रुपये सचिनने पुन्हा मागितले असता मयूरला त्याचा राग आला व त्यातून ही घटना घडली.
रागातून मयूर कदमने सचिन सावंत (४२) याला संत गाडगे महाराज मठाच्या भिंतीलगत असलेल्या महापालिकेच्या बंद असलेल्या हॉस्पिटलजवळच्या शिरीषकुमार चौकात बळजबरीने मोटारसायकलीवरून घेऊन गेले. येथे साथीदारांनी सचिन सावंत याला लाकडी दांडा व लोखंडी रॉडने डोक्यावर, छातीवर, पाठीवर व पायावर जबर मारहाण करुन खून केला. या घटनेनंतर मयूर कदम हा फरार झाला आहे.