इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : मुस्लिम समजाच्या नेत्यांना भाजपमध्ये जाता येत नसल्यामुळे त्यांनी भाजपच्या मित्रपक्षांबरोबर जाणे पसंत केल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी अगोदर राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि आझमी यांची मुंबईत बैठक झाली. त्यात हा पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.
सिद्दीकीसारखेच आझमी भाजपमध्ये प्रवेश करू शकत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा देत आझमी यांच्यावर टीका करीत पक्षत्याग केला. समाजवादी पक्षामध्ये दलालांचे राज्य आल्याची टीका त्यांनी केल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला होता; मात्र शेख यांचा निशाणा हा आझमी यांच्यावर होता.
गेल्या काही दिवसांपासून आझमी समाजवादी पक्षामध्ये नाराज आहेत. त्यांनी आता समाजवादी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय आहे. आझमी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर ईशान्य मुंबई लोकसभेचा मतदारसंघाचे गणित बदलणार आहे. या आधी आझमी हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. पण पटेल यांची भेट घेतल्यानंतर ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती आहे. आझमी राष्ट्रवादीत आले, तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात त्याचा फायदा महायुतीला होणार आहे.