निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– तालुक्यातील नैताळे परिसरात १५ दिवसापासुन धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर आज जेरबंद झाला. बिबट्याच्या अनेक वेळच्या दर्शनाने शेतकरी शेतमजुर भयभीत झाले होते. या बाबत येथील माजी सरपंच नवनाथ बोरगुडे यांनी वनविभागाकडे तक्रार करुन पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
त्यानंतर वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी भगवान जाधव व विंचूरचे वनरक्षक गोपाल राठोड यांनी आधुनिक बचाव पथकाच्या साह्याने गुरुवार १८ एप्रिल २०२४ रोजी नैताळे शिवारातील गोविंद कारभारी भवर व नवनाथ रामकृष्ण बोरगुडे यांच्या बांधावर गट नंबर १६३ मध्ये पिंजरा लावला होता.
रात्रीच्या सुमारास धुमाकुळ घालणारा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने परिसरातील नागरीकानी सुटकेशा निंःश्वास सोडला. पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या नर असुन त्याचे वय ३/४ वर्ष आहे. पकडलेला बिबट्या निफाडच्या वनउद्यानात आणण्यात आला असून त्याची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे.