इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना ‘बिनविरोध’ विजयी घोषित केल्यानंतर त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला केला आहे. हुकूमशहाचा खरा ‘चेहरा’ पुन्हा एकदा देशासमोर! आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जनतेचा नेता निवडण्याचा अधिकार काढून घेणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.मी पुन्हा एकदा सांगतो – ही केवळ सरकार स्थापनेची निवडणूक नाही, ती देश वाचवण्याची निवडणूक आहे, संविधानाच्या रक्षणाची निवडणूक आहे.
जितेंद्र आव्हाड यांची टीका
सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना ‘बिनविरोध’ विजयी घोषित केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, सुरतमध्ये काँग्रेसचे पहिले उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर सुरतमधून काँग्रेसच्या दुसऱ्या पर्यायी उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर भाजप उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. (की मागे घेण्यास भाग पाडले गेलं?)
आणि मग सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना ‘बिनविरोध’ विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक आयोग वारंवार सांगतो की सर्वांना समान संधी आणि न्याय मिळाला पाहिजे, परंतु तेदेखील सत्ताधा-यांच्या हातातले बाहुले झाले आहेत. अन्यथा ही परिस्थिती उद्भवली नसती.
हे ‘मॅच फिक्सिंग’ आहे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत कारण सध्या ते बिथरले आहेत. दहा वर्ष सत्ता उपभोगल्यानंतरही त्यांच्याकडे मतदारांना सांगण्यासारखे काही नाही. भाजपच्या उमेदवारांचे तर काहीच कर्तृत्व नाही. मोदींकडे निवडणूक सभांमध्ये बोलण्यासाठी काही नाही म्हणून ते हिंदू-मुसलमान या मुद्याकडे वळले आहेत.
उमेदवारी भरण्याच्या पातळीवरच सर्व यंत्रणा मॅनेज करूनच ही लोकं ‘४०० पार’चा नारा देत आहेत. म्हणून आम्ही वारंवार सांगतोय ही लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठीची निवडणूक आहे.