मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या संकल्पनेवर हा जाहीरनामा आधारित आहे. विकसित भारताची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे. सार्वजनिक सेवा, पायाभूत प्रकल्प व सुविधा, आर्थिक प्रगती संदर्भातील विचार याठिकाणी व्यक्त करण्यात आलेले आहेत. राज्यातल्या सर्व समाज घटकांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, त्याचप्रमाणे राज्याच्या आणि देशाच्या विकास प्रक्रियेला पुढे नेणारा हा जाहीरनामा आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करणार, स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा, शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव मिळावा, अपारंपरिक वीज निर्मितीला चालना, उद्योगांना प्राधान्य, कृषी पिकविम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ, मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ, जातीनिहाय जनगणना, ऊर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वन क्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा इत्यादी जाहीरनाम्यातील ठळक वैशिष्ट्ये आहेत.
आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रामविकासाची पंचसूत्री असून त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व काम करीत आहोत. यंदाची लोकसभा निवडणूक देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत असून त्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास’, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची श्रद्धा आहे. याच भूमिकेतून ‘राष्ट्राचा विकास, राष्ट्राचा विश्वास आणि राष्ट्राची साथ’, या त्रिसूत्रीसाठी यंदाची लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे.