इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – महाराष्ट्र हौशी मल्लखांब असोसिएशनच्या वतीने आणि मार्गदर्शनाखाली नाशिक डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशन आणि यशवंत व्यायाम शाळा, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत व्यायाम शाळा येथे महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये समावेश असलेल्या मुले आणि मुलीं या मल्लखांब खेळाडूंच्या शिबिराला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. हे शिबिर आठ दिवस सुरू राहणार आहे. महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यासाठी दिनांक ८ ऑक्टोबर, २०२३ रोजी यशवंत व्यायाम शाळा येथे विविध जिल्ह्यातून आलेलें खेळाडूंच्या राज्य स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील कामगीरीच्या आधारे पहिल्या सहा खेळाडूंची महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघासाठी निवड करण्यात आली होती.
या शिबिराचे उद्घाटन यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष तथा मल्लखांबचे राष्ट्रीय स्पर्धा आणि अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते दिपक पाटील, महाराष्ट्र हौशी मल्लखांब असोसिएशनचे सचिव श्रेयस म्हसकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नाशिक डिस्ट्रिक्ट मल्लखांब असोसिएशन सचिव रमेश वझे, पदाधिकारी उल्हास कुलकर्णी, दत्ता शिरसाठ, संतोष भालेराव आणि मल्लखांब खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी खेळाडूंना संबोधित करतांना दिपक पाटील यांनी सांगितले की मल्लखांब हा खेळ अत्यंत मेहनतीचा आणि कष्टाचा खेळ आहे. अधुनिकतेच्या वाटचालीमध्ये यशवंत व्यायाम शाळेने सर्वांना अभिमाब असलेल्या मल्लखांब या खेळला कायमच प्राधान्य दिलेले आहे. येथे खेळाडूंच्या उन्नतीसाठी सर्व प्रकारचे साहित्य, सुविधा आणि तज्ञ प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण देण्याचा आमचा कायमच प्रयत्न असतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या संघामधील खेळाडूही याचा लाभ घेवून गोवा येथे आयोजित ३७ व्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राला किमान ९ ते १० पदके मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राज्य सचिव श्रेयस म्हसकर यांनीही मार्गदर्शन केले आणि जिंकण्यासाठी आवश्यक महत्वाच्या टिप्स दिल्या.
महाराष्ट्राच्या मुलांच्या संघामध्ये शुभंकर खवळे, दिपक शिंदे, कृष्णा आंबेकर, ऋषभ घुबडे, आदित्य पाटील आणि अक्षय तरल तर मुलींच्या संघामध्ये रुपाली गंगावणे, सई शिंदे, जान्हवी क्षीरसागर, पल्लवी शिंदे आणि निधी राणे या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षक स्वप्नील खेसे आणि प्रणाली जगताप यां तज्ञ प्रशिक्षकांमार्फत तीन सत्रात सराव करून घेतला जात आहे. खेळाडूंची निवास आणि भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.