नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात चैनस्नॅचरांचा सुळसुळाट झाला असून रविवारी (दि.२१) वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये तीन महिलांच्या गळयातील अलंकारांवर दुचाकीस्वार भामट्यांनी डल्ला मारला. या घटनेत सुमारे साडे तीन लाख रूपयांचे अलंकार भामट्यांनी ओरबाडून नेले असून याप्रकरणी आडगाव आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना चेतनानगर भागात घडली. रोहिणी रमाकांत जोशी (रा.आयोध्यानगर,राज टावर पाठीमागे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जोशी शनिवारी रात्री जेवण आटपून आपल्या घर परिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. राज टावर भागातून त्या रस्त्याने पायी जात असतांना समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ५४ हजार रूपये किमीतीची सोनसाखळी ओरबाडून नेली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
दुस-या घटनेत सावरकरनगर येथील शोभा उत्तम खोडे (रा.गंगापूर पोलीस स्टेशन समोर) या शनिवारी (दि.२०) सायंकाळी आडगाव शिवारात गेल्या होत्या. बळी मंदिराकडून त्या सिध्दीविनायक चौकाच्या दिशने पायी जात असतांना निलगिरी बाग भागात मोटारसायकलवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
तिसरी घटना औरंगाबादरोडवरील मिरची हॉटेल भागात घडली. शारदा वामन टेकवडे (रा.लोणी काळभोर जि.पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. टेकवडे या रविवारी विवाह सोहळया निमित्त शहरात आल्या होत्या. धनलक्ष्मी लॉन्सच्या बाहेर त्या उभ्या असतांना रस्त्याने भरधाव जाणा-या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे १ लाख ९८ हजार रूपये किमीतीचे गठंण मंगळसुत्र ओरबाडून नेले. दोन्ही घटनांप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे आणि दाईगडे करीत आहेत.