सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी नामनिर्देशन पत्र माघारीच्या अखेरच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. या जागेवरुन महाविकास आघाडीत संघर्ष सुरु होता.
शिवसेना ठाकरे गटाने येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची अगोदरच उमेदवार येथे घोषीत केल्यामुळे काँग्रेसमध्ये संताप होता. त्यानंतर काँग्रसचे विशाल पाटील बंड करत उमेदवारी भरली. पण, माजी मंत्री विश्वजीत कदमसह काँग्रेसच्या नेत्यांनी माघारीसाठी प्रयत्न करुनही ते फोल ठरले. ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी तीन दिवसाअगोदर विशाल पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील असे सांगितले होते. पण, ही माघार झालीच नाही.
सांगलीत ७ मे रोजी मतदान आहे. विशाल पाटील यांचे बंधू आणि माजी खासदार प्रतीक पाटील यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. या मतदार संघात आता भाजपचे खासदार संजयकाका पाटील, ठाकरे गटाचे डबल केसरी चंद्रहार पाटील व विशाल पाटील यांच्यात तिरंगी सामना होणार आहे.
एकीकडे माढा मतदार संघात महायुतीमध्ये बंड झालेले असतांना आता महाविकास आघाडीत सांगलीत बंड झाले. त्यामुळे या दोन्ही जागेवर बंडाचा फायदा कोणाला होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान विशाल पाटील यांची आता काँग्रेसमधून हकालपट्टी होणार असल्याचे बोलले जात आहे.