इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रबळ दावेदार छगन भुजबळ यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय़ घेतल्यानंतरही या जागेवर तीन दिवस उलटूनही उमेदवार जाहीर झालेला नाही. या जागेवर तिढा सुटला असे बोलले जात असतांना भाजपने डाव टाकत नाशिकची जागा मागितल्यामुळे पुन्हा पेच तयार झाला आहे. भाजपने दोन जागेवर दावा केला असून त्यात ठाणे व नाशिक आहे. यापैकी एक जागा भाजपला द्या असा प्रस्ताव दिल्यामुळे शिंदे सेना पेचात पडली आहे.
ठाणे सोडला येत नाही व नाशिक देता येत नाही असा हा घोळ झाल्यामुळे आता हा तिढा कसा सुटतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. दोनपैकी एक जागा द्यायचे ठरले तर ती नाशिकचीच जागा असणार आहे. त्यामुळे शिंदे गटाला नाशिकमध्ये मोठा झटका बसू शकतो. या जागेवर विदयमान खासदार हेमंत गोडेसे यांनी उमेदवारी मिळणार या भरोशावर प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. त्यांचे संभाव्य उमेदवाराचे पत्रकही घरोघरी वाटप झाले आहे. त्यामुळे अवघा एक महिना बाकी असतांना जर भाजपला ही जागा गेल्यास शिंदे गटात मोठे बंड होऊ शकते.
नाशिकच्या या जागेसाठी भाजपकडून विद्यमान आमदारसह अनेक नेते इच्छुक आहे. त्यांनी सुध्दा या जागेवर जोर लावला आहे. त्यामुळे नाशिकचा तिढा भुजबळांच्या निर्णयानंतरही कायम आहे. तर दुसरीकडे भुजबळांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय़ घेतला असला तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाने ही जागा अद्याप सोडलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. या जागेवर विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे, निवृत्ती अरिंगळे यांचे नावही आता उमेदवारीसाठी चर्चेत आहे.