इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाविकास आघाडीने जवळपास सर्वच जागांवर उमेदवार घोषीत केलेले असतांना महायुतीमधील तिढा मात्र अजूनही संपलेला नाही. कोणता पक्ष किती जागा लढवले हेही पुढे आले नाही. पण, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच शिवसेना १६ जागेवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली आहे. शिंदे गटाने आतापर्यंत ११ जागेवर उमेदवार दिले असून अद्यापपर्यंत मुंबईच्या दोन व ठाणे, पालघर, नाशिक येथील उमेदवार घोषीत होणे बाकी आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे पहिल्यांदा शिवसेना शिंदे गट किती जागा लढवणार असल्याचे समोर आले. या मुलाखतीत त्यांनी महायुतीत जागा वाटपाचा कोणताही तिढा नाही. आम्ही ४२ जागेवर विजय मिळवू असेही सांगितले.
असा आहे फॅार्म्युला
दरम्याना जागा वाटपाचा कोणताही फॅार्म्युला महायुतीने अधिकृत जाहीर केला नसला तरी शिवसेना शिंदे गटाने १६ जागा लढवणार असल्याचे समोर आल्यानंतर आता भाजप २७, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी ५ जागा लढवणार असल्याचे बोलले जात आहे. महायुतीलमधील भाजपला २७ जागा मिळाल्या असून त्यांनी २६ जागेवर उमेदवार घोषित केले आहे. तर एक जागा त्यांनी उत्तर मुंबई आणि दक्षिण मुंबईपैकी मिळू शकते. राष्ट्रवादी अजित पवार यांना ५ जागा मिळाल्या असून त्यांनी सर्व उमेदवार घोषीत केले आहे. तर शिंदे गटाने अद्यापही पाच ठिकाणी उमेदवार घोषीत केलेले नाही. त्यामुळे वरवर जागा वाटप जर झाले असेल तर उमेदवारी देण्यासाठी इतका वेळ का लागतो आहे. हा प्रश्न मात्र सर्वांच्या मनात कायम आहे.