इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
न्यूयार्कः आता पुन्हा एका आजारामुळे देशभरात चिंता वाढली आहे. हा आजार एच ५ एन १ बर्ड फ्लू विषाणूमुळे होत असून तो रोग खूप वेगाने पसरू शकतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे. यातील मृत्यूची संख्या कोविडपेक्षा १०० पट जास्त असू शकते. एका अहवालानुसार, हा विषाणू आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, की तो जगभरात महामारी पसरवू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की अलीकडेच एच ५ एन १ नावाचा बर्ड फ्लू आजारी जनावरांच्या कच्च्या दुधात मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.; मात्र, हा विषाणू दुधात किती काळ जगू शकतो, हे अद्याप कळू शकलेले नाही. अलीकडेच अमेरिकेतील टेक्सासमध्ये काही गायींना बर्ड फ्लूची लागण झाली होती. तिथल्या एका डेअरी फार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीलाही या गायींची देखभाल करताना हा आजार झाला. ही चिंतेची बाब असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आतापर्यंत बर्ड फ्लू हा पक्ष्यांकडून पसरत होता; मात्र पहिल्यांदाच हा आजार गायीपासून मानवांमध्ये पसरला आहे.
काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे, की बर्ड फ्लूचा हा विषाणू बदलत आहे. पूर्वी हा आजार फक्त पक्ष्यांकडून गायींमध्ये पसरत होता. आता हा आजार गायीपासून गायीकडे आणि गायीपासून पक्ष्यांमध्येही पसरत आहे. आणखी एक चिंतेची बाब म्हणजे आजारी गायींच्या दुधातही हा विषाणू आढळून आला आहे. शास्त्रज्ञांसाठी हे आश्चर्यकारक आहे. कारण हा फ्लू गायी आणि शेळ्यांना होऊ शकतो असे त्यांना वाटत नव्हते; परंतु काही गायींना फ्लू या शब्दाची लागण झाल्याचे तपासात समोर आले आहे
एच ५ एन १ हा फ्लूचा एक प्रकारचा विषाणू आहे; परंतु हा मानवी फ्लू नसून बर्ड फ्लू आहे. म्हणूनच याला बर्ड फ्लू असेही म्हणतात. हा विषाणू प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये राहतो आणि त्यांना आजारी बनवतो. कधीकधी इतर सस्तन प्राण्यांनाही असे होऊ शकते. जर एखाद्या पक्ष्याला हा फ्लू झाला, तर त्याच्या जवळ राहून, त्याला स्पर्श केल्याने किंवा त्याच्या विष्ठेला स्पर्श केल्यानेदेखील मानवाला संसर्ग होऊ शकतो. एखाद्या ठिकाणी आजारी पक्षी असले, तरी ती जागा दूषित असू शकते आणि त्यातून मानव आजारी होऊ शकतो. जर हा फ्लू मानवांना झाला, तर तो खूप गंभीर असू शकतो. यामुळे खूप ताप, खोकला, घसा खवखवणे, न्यूमोनिया (फुफ्फुसाचा संसर्ग) किंवा कधी कधी खूप वाईट स्थिती होऊ शकते.