इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जळगावमध्ये लोकसभेमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. भर निवडणुकीत पक्षांतर होत असल्यामुळे येथील राजकीय गणितही बिघडले आहे. राष्ट्रवादी शरद पवारालाही मोठे झटके बसले आहे. आता भाजप प्रवेशाच्या तयारीत असलेल्या आमदार एकनाथ खडसे यांचा विधान परिषद सदस्यत्वाच्या राजीनाम्याची मागणी त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या समोर करण्यात आल्यामुळे त्याची राजकीय चर्च चांगलीच रंगली आहे. पण, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र तो निर्णय ‘साहेबां’चा असल्याचे सांगत विषयावर पडदा पाडला.
उद्योजक श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील अंतर्गत विरोध उफाळून आला आहे. त्यातून तोडगा काढण्यासाठी जयंत पाटील हे जळगावला शनिवारी आले होते. यावेळी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आपल्याला प्रचारात विश्वासात घेत नाहीत, बॅनरवर आपला फोटो वापरत नाहीत, अशी तक्रार रोहिणी यांनी केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी असे करू नका, असे सांगितले.
प्रदेशाध्यक्षांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली. जयंत पाटील यांच्या दौऱ्याची माहिती पक्षाच्या अत्यंत निवडक नेते आणि पदाधिकाऱ्यांनाच होती. एका विशेष हेलिकॉप्टरने ते आले. एका हॉटेलवर अत्यंत मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
काँग्रेसचे रावेरचे आमदार शिरीष चौधरी या बैठकीला उपस्थित होते; परंतु निरोप देऊनही माजी आमदार संतोष चौधरी बैठकीला आले नाहीत. त्यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रहार जनशक्तीतर्फे चौधरी रावेरमधून उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे.