नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फुलेनगर भागात मोबाईल दिला नाही या कारणातून एकास फायटरने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत ३३ वर्षीय व्यक्ती जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉबी बाबर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत विरेद्र हवालदार राम (रा.गौडवाडी,फुलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. विरेंद्र राम गुरूवारी (दि.१८) सायंकाळी परिसरातील प्रविण किराणा दुकानामागे बसलेला असतांना संशयिताने त्यास गाठले.
यावेळी एक फोन लावायचा आहे असे म्हणून त्याने मोबाईलची मागणी केली. मात्र राम याने मोबाईल देण्यास नकार दिल्याने संतप्त संशयिताने फायटरने त्यास बेदम मारहाण केली. या घटनेत विरेंद्र राम जखमी झाला असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.
गांजा विक्रेता पोलीसांच्या जाळयात
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड परिसरातील मालधक्कारोड भागात गांजा या अमली पदार्थची विक्री करणाºया एकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून सुमारे २८ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत रमेश पाटील (रा.भारतनगर, हल्ली पवननगर,सिडको) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मालधक्कारोडवरील नुरीमज्जीद जवळ एक इसम गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.१९) पथकाने धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात सुमारे २८ हजार रूपये किमतीचा गांजा या अमली पदार्थचा साठा मिळून आला. याबाबत अंमलदार अजय देशमुख यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोरडे करीत आहेत.