नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोंधळ घालणा-या बापलेकाने पोलीसांच्या गस्ती पथकास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार गोदाघाटावरील रामसेतु पुल परिसरात घडली. या घटनेत बापलेकाने उभ्या असलेल्या छोटा हत्ती वाहनाची काच फोडून नुकसान केले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश पेखळे (रा.मंगळादेवी परिसर,जुने नाशिक) व त्याचे वडील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. याबाबत पंचवटीचे अंमलदार किसन पोपट गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. पेखळे बापलेक शुक्रवारी (दि.१९) रामसेतू पुलाखाली गोंधळ घालत होते. येणा-या जाणा-यांना शिवीगाळ व मारहाण करीत असल्याची माहिती मिळताच गस्ती पथकाने धाव घेत दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संतप्त बापलेकाने पोलीसांनाही शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली.
यावेळी गणेश पेखळे याने पार्क केलेल्या एका छोटा हत्ती वाहनाची काच फोडून नुकसान केले असून अधिक तपास उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.