इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ एप्रिल रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे महावीर जयंतीच्या शुभ प्रसंगी भगवान महावीर महोत्सवाचे उद्घाटन सकाळी १० वाजता करणार आहेत. यावेळी पंतप्रधान एका स्मृती तिकीटाचे आणि नाण्याचे प्रकाशन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.
२४ वे तीर्थंकर असलेल्या भगवान महावीर यांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या जैन सिद्धांतांच्या माध्यमातून शांततामय सहअस्तित्व आणि सार्वत्रिक बंधुभाव यांचा मार्ग प्रकाशित केला.
जैन बांधव महावीर स्वामीजींसह प्रत्येक तीर्थकरांचे पाच कल्याणक (प्रमुख कार्यक्रम) साजरे करतात. ते आहेत च्यवन/गर्भ (धारणा) कल्याणक, जन्म कल्याणक, दीक्षा कल्याणक, केवलज्ञान कल्याणक आणि निर्वाण कल्याणक.
२१ एप्रिल हा दिवस भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक आहे आणि या निमित्ताने भारत मंडपम येथे उपस्थित राहणाऱ्या आणि या समारंभाला आशीर्वाद देणाऱ्या जैन समुदायातील संतांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून सरकार हा सोहळा साजरा करत आहे.