दीपक ओढेकर, नाशिक
एखाद्या स्वप्नाचा आणि ध्येयाचा आयुष्यभर ध्यास घ्यावा. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जीवाचे रान करावे आणि कठोर मेहनत करावी. अनेक सुखांचा त्याग करावा …आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचणार नेमका त्याचवेळी नशीबाने दगा द्यावा आणि काही फासे उलटे पडावे याला दुर्दैवा शिवाय काय म्हणावे ?
नाशिकचा सुप्रसिद्ध बुद्धिबळ पटू ग्रॅंडमास्टर विदित गुजराथी याच्याबद्दल नेमके हेच झाले ! टोराँटो येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची सेमी फायनल म्हणजेच जगातील अव्वल आठ खेळाडूमध्ये सुरु असलेल्या कॅंडिडेट स्पर्धेतील विजेता आव्हानवीर जगज्जेता चीनच्या डिंग लिरेनशी दोन हात करेल. त्यात प्रथमच तीन भारतीय खेळत आहेत त्यापैकी एक विदित आहे.
विश्वनाथ आनंद सहीत जगातील अनेक बुद्धिबळ तज्ज्ञ आणि जाणकार यांनी अमेरिकेचे हिकारु नाकामुरा आणि करुआना यांना Pre- tournament favourite मानले पण त्यातील नाकामुराला विदितने दोनदा धूळ चारली आणि करुआनाला पहिल्या डावात बरोबरीत रोखले होते पण १४ डावांच्या या स्पर्धेत अशा अत्यंत आश्वासक सुरुवातीनंतर मात्र विदित जो ढेपाळला तो आता बारा डाव झाल्यावर आणि त्यापैकी तब्बल पाच पराभव झाल्यामुळे विजेतेपदाच्या रेसमधून बाहेरच फेकला गेला आहे .
खरंतर त्याचा खेळ उत्तम होत आहे पण अपेक्षांचे ओझे आणि ऐन मोक्याच्यावेळी दडपण घेण्याची जुनी सवय पुन्हा उफाळून आल्याने तो किमान दोनदा जिंकता जिंकता हरला तेही १२ व्या डावानंतर आघाडीवर असलेल्या रशियाच्या आयन नेपोम्नियाची (नेपो ) बरोबर ! स्वत: नेपो दोन्ही डावात आपण हरत आहोत हे गृहीत धरुन खेळत होता आणि विदितच्या काही अनपेक्षित चाली पाहून इतका चकीत झाला की आपण कसे जिंकलो हेच त्याला समजेना . त्याने जिंकल्यावर आनंद व्यक्त करण्याऐवजी तो सुन्न झाला तर विदितने कपाळावर हात मारुन घेतला ! हे दोन पराजय विदितला फारच महागात पडले …
या अनपेक्षित आणि धक्कादायक पराभवानंतर विदित गुकेश आणि प्रद्न्यानंदन कडूनही एकेकदा हरला आणि जी गाडी घसरली ती घसरलीच !
आज १३ वा डाव सुरु होईल( आणि उध्या अंतिम १४ वा ) तेंव्हा १२ डावानंतर त्याच्या खात्यात केवळ ५ गुण आहेत ( तीन विजय , चार बरोबरी आणि तब्बल पाच पराभव ! ) विदितने आता राहिलेले दोन्ही डाव जरी जिंकले तरी त्याचे ७ च गुण होतील. या उलट पहिल्या क्रमांकावर संयुक्त पणे असलेल्या तिघांचे ( नाकामुरा , गुकेश आणि नेपो ) गुण आहेत ७:५ आणि ते आज आणि उध्या वाढतील!
अतिशय तीव्र स्पर्धा असलेल्या या खेळात आता २९ वर्षे वयाच्या विदितला पुन्हा अशी सुवर्णसंधी मिळणार का? कारण बुद्धिबळ आता गुकेश , प्रद्न्यानंदन, अर्जुन एरिगियासी , तसेच अलिरझा फिरौझा , अब्दुसत्तारोव इ तरुण खेळाडूच्या हातात गेले आहे. त्यांचे वय, उत्साह आणि Devil may care अशी वृत्ती यामुळे बुद्धिबळ खेळाच्या दृष्टीने वयस्कर खेळाडू कितपत टिकाव धरु शकतात हा प्रश्न आहे !
पण यालाही उत्तर नाकामुराने दिले आहे तो म्हणतो की या स्पर्धेतील दोन आघाडीचे खेळाडू (नाकामुरा, नेपो आणि चौथ्या क्रमांकावरील करुआना) हे तिशी पार केलेले खेळाडू आहेत आणि येथ पर्यंत येण्यासाठी अनुभव हा सर्वात मोठा घटक मानायला हवा. नेपो आणि करूआना हे गेलि किमान सहा कॅंडिडेट स्पर्धेत विजेते ठरलेले आहेत !
या दृष्टीने बघितले तर विदितने या स्पर्धेतील कामगिरी विसरून पुन्हा नव्याने तयारी केली पाहिजे आणि त्याने करावी , तो करेलही ,
त्याच्या नशीबात जग्गजेतेपदाची स्पर्धा असेल तर त्याला कुणी रोखू शकणार नाही !
deepakodhekar@gmail.com