इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने संदिपान भुमरे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. पण, नाशिकसह, पालघर, ठाणे व दक्षिण मुंबई जागेबाबत मात्र कोणतीच घोषणा अद्याप झालेली नाही. राज्यातील बहुतांश जागा महायुतीने जाहीर केल्या असल्या तरी काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. त्यात मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा सर्वात चर्चेची होती. या मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. आज या जागेवर मंत्री संदिपान भुमरे यांच्या नावावार शिक्कमोर्तब करण्यात आले. २५ एप्रिल रोजी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहे.
संभाजीनगरमधून मंत्री संदीपान भुमरे यांच्याबरोबरच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे नाव चर्चेत आहे; परंतु छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेलाच देण्याचे निश्चित झाले. संभाजीनगरचा उमेदवार ठरला असला तरी अजून नाशिक, पालघर, ठाणे व दक्षिण मुंबई या जागेवर उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही.
खैरे व भुमरे यांच्यात लढत
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे व शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्यात लढत होणार आहे. या ठिकाणी एमआयएम व वंचितचाही उमेदवार असल्यामुळे त्याचा फटका कोणाला बसतो हे महत्त्वाचे आहे.