नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कामटवाडा शिवारातील मोगलनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकड,सोन्याचांदीच्या दागिण्यांसह देवघरातील चांदीच्या मुर्त्या,लॅपटॉप आणि घड्याळाचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रितेश सुरेश सोनजे (रा.शकुंतला बंगलो,मोगलनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनजे कुटूंबिय गेल्या मंगळवारी (दि.१६) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटातील रोकड व सोन्याचांदीच्या दागिण्यासह देवघरातील चांदीच्या मुर्त्या आणि लॅपटॉप व घड्याळ असा सुमारे ३ लाख ६० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
चाकू घेवून फिरणा-या तरूणावर कारवाई
नाशिक : वर्दळीच्या दूधबाजारात धारदार चाकू घेवून फिरणा-या तरूणाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयिताच्या ताब्यातून चाकू हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित बाळू जाधव (२२ रा.ड्रिम पार्क,मालधक्कारोड,ना.रोड) असे संशयित चाकूधारीचे नाव आहे. दुधबाजारातील मुगलदरबार हॉटेल भागात एकाकडे धारदार चाकू असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार भद्रकाली पोलीसांनी धाव घेत संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी चाकू मिळून आला. संशयितास ताब्यात घेत चाकू जप्त करण्यात आला असून याबाबत अंमलदार नितीन भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार साळुंके करीत आहेत.