नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –नाशिकरोड रेल्वे स्टेशन भागात सराफी दुकानातून ग्राहक म्हणून आलेल्या दोन भामट्या महिलांनी लाखाचा नेकलेस चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटिव्हीच्या आधारे भामट्या महिलांचा शोध घेत आहेत.
ओमकार राजेंद्र नागरे (रा.नारायण बापूनगर,जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. नागरे यांचे रेल्वे स्टेशन परिसरातील देवी चौकात कलंत्री हाऊस या इमारतीत नागरे अॅण्ड सन्स नावाचे सराफी दुकान आहे. या दुकानात गुरूवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास दोन अनोळखी महिला खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या.
विविध प्रकारचे अलंकार बघण्याचा बहाणा करून या भामट्या महिलांनी मालकाचे लक्ष विचलीत करून सुमारे ९५ हजार १५० रूपये किमतीचा सोन्याचा नेकलेस हातचलाखीने चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.