नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटीतील तीन सावकारांवर पंचवटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परतफेडकरूनही बनावट कागदपत्राच्या आधारे संशयितांनी घर बळकवण्याचा प्रयत्न केल्याने कर्जदाराने पोलीसात धाव घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नितीन करसन परमार (रा.साई अपा.जुना आडगावनाका),विकास सुनिल पाटील (रा.शिवसाई रो हाऊस कलानगर,दिंडोरी रोड) व अनिल दत्तात्रेय नेरकर (रा.पोकार संकुल साईनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खासगी सावकारांची नावे आहेत. याबाबत सोमनाथ गंगाधर कारे (६७ रा.गोकुळधाम रेसि.लामखेडे मळा,पंचवटी) या वृध्दाने फिर्याद दाखल केली आहे.
कारे यांच्या मुलाने २०२३ मध्ये संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. यापोटी घराचे व दुचाकीचे कागदपत्र देण्यात आले होते. या रकमेची व्याजासह परतफेड करूनही संशयितांनी दमदाटी करून घराचे तसेच दुचाकीचे बनावट कागदपत्र तयार केले. या कागदपत्राच्या आधारे कारे यांच्या घरात घुसून घर खाली करण्याची धमकी दिल्याने कारे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.