इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे कृषी आयुक्त म्हणून डॅा. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची जलसंधारण सचिव म्हणून बदली झाल्यानंतर या पदावर ही नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्षम व धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. या नियुक्तीमुळे ते पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे.
डॉ. गेडाम हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात. हॉर्वर्डमधील पदवीनंतर ते महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेत परततील अशी अटकळ होती. मात्र, पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सीईओ म्हणून त्यांना ऑगस्टमध्येच २०२७ पर्यंत मुदतवाढ दिेलेली होती. मात्र आता अचानक कृषी आयुक्त म्हणून डॉ. गेडाम यांना नियुक्ती दिली गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
डॉ. गेडाम हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. राज्यभरात गाजलेला जळगावचा घरकुल घोटाळा त्यांनी बाहेर काढला. याच प्रकरणी माजी आमदार सुरेश जैन आणि अन्य नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तसेच, डॉ. गेडाम यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदासह विविध शहरांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
त्यांच्या सर्वोत्तम कारभाराची दखल घेत मोदी सरकारने त्यांना केंद्रात बोलवून घेतले. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. आता त्यांना ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.