नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून गुजरात राज्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर नवापूर येथे सीमा तपासणी नाका उभारण्यात आला असून यासाठी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचां भंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने वाहनांची तपासणी करण्यात येत असून सीमा तपासणी नाक्यावर होणारी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी काही वाहने सिमा तपासणी नाका टाळून बायपास मार्गाने वाहतूक करत असल्यामुळे अशा वाहनांची विशेष तपासणी परिवहन विभागाकडून करण्यात येत असून 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2024 या कालावधीत 17 दोषी वाहनांवर दंडात्मक कार्यवाई करण्यात आली आहे. या वाहनांकडून एकूण 7 लाख 250 रूपये शुल्क वसुल करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने ओव्हरलोड वाहतूक करणे, परवाना वैध नसणे, वाहनाचा विमा मुदतीत नसणे, रिफ्लेक्टर नसणे, खाजगी बस मधुन जादा प्रवासी वाहतुक करणे, प्रवासी वाहनातून माल वाहतूक करणे, परवाना अटींचे उल्लंघन करणे इत्यादी गुन्हांचा समावेश आहे.
ही कारवाई सीमा तपासणी नाका नवापूर येथे कार्यरत मोटार वाहन निरीक्षक रविंद्र देवरे, हरेश्वर पोतदार, सचिन दळवी, अनूज भामरे, रविंद्र बंदरकर, प्रविण महाले, गणेश पिंगळे, मनिषा चौधरी, राहूल जाधव यांनी केली असून पुढील काळातही अशा वाहनांवर कार्यवाई करण्यात येणार असल्याचेही श्री. बिडकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.