इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देत उत्तम जानकर यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मला उत्तम जानकर यांचे कौतुक करावेसे वाटते की, अनेक प्रलोभने समोर असताना, अनेक आश्वासने समोर असताना त्यांनी माळशिरसच्या जनतेसोबत राहण्याचा व स्वाभिमानाने विधानसभेत पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मोहिते पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेऊन तालुक्याचा विकास करण्याचा मानस केला आहे. मला खात्री होती जानकर हे योग्य भूमिका घेतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण आज बदलले आहे. अकलूज आणि माळशिरसमध्ये जो निर्णय झाला त्याने दाखवून दिले की, महाराष्ट्रात आम्ही स्वाभिमानाने राहतो. दिल्लीसमोर आम्ही झुकत नाही. तुम्ही कितीही विमानं पाठवली तरी आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही हे जानकर यांनी दाखवून दिले.
२०१४ पासून काही जणांनी महाराष्ट्राचे वातावरण खेळवत ठेवले आहे. या १० वर्षात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था या लोकांनी वाईट केली. दबाव टाकायचा आणि पक्षात घ्यायचे असा पायंडा घातला जात होता. देशातील आणि राज्यातील अनेक लोकांनी हे भोगले. पण मोहिते पाटील आणि जानकर साहेबांनी हा पायंडा मोडून काढला. मी दोघांचे अभिनंदन करतो.
विविध पक्षामध्ये आपले अनेक उमेदवार अडकले आहेत. पण २०२४ सालच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूयात. आपल्या सर्वांची सोबत असताना ते सहज शक्य आहे, हा मला विश्वास वाटतो असे पाटील म्हणाले.








