इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगरः राज्यातील बहुतांश जागा महायुतीने जाहीर केल्या असल्या तरी काही जागांवर अद्याप तिढा कायम आहे. त्यात मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा सर्वात चर्चेची आहे. या मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. आज या जागेवर मंत्री संदिपान भुमरे यांच्या नावावार शिक्कमोर्तब करण्यात आले. २५ एप्रिल रोजी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहे.
काही दिवसापापूर्वी मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे त्यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा सुरु होती. यावेळी विमानतळावर पाटील यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करत हमारा खासदार कैसा हो, विनोद पाटील जैसा हो’ च्या घोषणा दिल्या होत्या. पण, शिवसेनेने भुमरे यांनाच पसंती दिली.
संभाजीनगरमधून मंत्री संदीपान भुमरे यांच्याबरोबरच केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे नाव चर्चेत आहे; परंतु छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेलाच देण्याचे निश्चित झाले. संभाजीनगरचा उमेदवार ठरला असला तरी अजून नाशिक, पालघर, ठाणे व दक्षिण मुंबई या जागेवर उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही.
खैरे व भुमरे यांच्यात लढत
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे व शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्यात लढत होणार आहे. या ठिकाणी एमआयएम व वंचितचाही उमेदवार असल्यामुळे त्याचा फटका कोणाला बसतो हे महत्त्वाचे आहे.