इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी सभा झाली. पण, ही प्रचारसभा भाषणांपेक्षा लंके यांचा साधेपणामुळे लक्षवेधी ठरली. या प्रचारसभेसाठी शरद पवार, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. सभेच्या वेळी व्यासपीठावर मान्यवरांची गर्दी झाल्यामुळे बसण्यासाठी खुर्च्या कमी पडल्या. तेव्हा लंके स्टेजच्या एका कोपऱ्यात मांडी घालून खाली बसले होते. सभेतील या दृश्याची वक्त्यांच्या भाषणांपेक्षा जास्त चर्चा रंगली.
या सभेत शरद पवार यांनी लंके यांचा साधेपणा बाबत कौतुक केले. नीलेश लंके आणि राणी लंके यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यासाठी फुले आणली. पण लंके यांनी ती फुले दुसऱ्यालाच देऊन टाकली, असे निदर्शनास आणून पवार यांनी लंके यांचा स्वभाव असाच आहे. ते स्वत:साठी काही ठेवत नाही, दुसऱ्याला देऊ टाकायचे, या वृत्तीचे आहेत, असे सांगत त्यांच्या साधेपणाचा गौरव केला.
या सभेत शरद पवारांनी यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. त्यांनी नीलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका, दुसरा कोणताही उमेदवार आम्हाला चालेल असा निरोप महसूल मंत्र्यांनी एका उद्योजकांमार्फत पाठवला होता असा गौप्यस्फोट केला. या उद्योजकांचे नाव न सांगता पवार यांनी तीन अक्षरी उद्योजक माझ्याकडे आल्याचे सांगून सस्पेंसही ठेवला..
भाजपचे सुजय विखे पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे नीलेश लंके यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु असतांना हे उद्योजक शरद पवारांकडे आले होते. त्यावेळेसची माहिती देऊन पवारांनी विखेपाटील यांना चांगलाच चिमटा काढला.