इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पहाटेच्या शपथविधीचा अजित पवार यांनी गौप्यस्फोट केलेला असतांना अहमदनगरमध्ये शरद पवारांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. त्यांनी नीलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका, दुसरा कोणताही उमेदवार आम्हाला चालेल असा निरोप महसूल मंत्र्यांनी एका उद्योजकांमार्फत पाठवला होता असा गौप्यस्फोट केला. या उद्योजकांचे नाव न सांगता पवार यांनी तीन अक्षरी उद्योजक माझ्याकडे आल्याचे सांगून सस्पेंसही ठेवला..
अहमदनगरमध्ये प्रचार सभेत त्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, युवा नेते आदित्य ठाकरे, भूषणसिंह होळकर, आमदार रोहित पवार यावेळी उपस्थितीत होते.
भाजपचे सुजय विखे पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे नीलेश लंके यांच्या उमेदवारीची चर्चा सुरु असतांना हे उद्योजक शरद पवारांकडे आले होते. त्यावेळेसची माहिती देऊन पवारांनी विखेपाटील यांना चांगलाच चिमटा काढला.