इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत यांच्या उपस्थितीत भरण्यात आला. या मतदार संघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंड केल्यानंतर सावंत यांची उपस्थिती चर्चेची ठरली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय राऊत, आ. सुमनताई पाटील, आ. अरूण लाड, , नितीन बानुगडे पाटील हे उपस्थितीत होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एका बलाढ्य विरोधकाला हरवून चंद्रहार पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. महाराष्ट्रात कुस्तीची प्रशिक्षण देणारी मोठी यंत्रणा निर्माण करण्यासाठी ते धडपडत आहेत. कुस्ती वीरांवर प्रेम करणारा हा भाग आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील यांना लोकांना विजयी करतील.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक क्रांतिकारक निर्णय घेतला. जत तालुक्यातील ६५ दुष्काळी गावांना ६ टीएमसी पाणी देत मोठा दिलासा दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात जत तालुका बागायती होण्यास पूर्ण मदत होईल. खानापूर, आटपाडी, मंगळवेढ्यापर्यंत अशा ११९ गावांना टेंभू योजनेद्वारे ८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. येत्या दोन वर्षात हे परिवर्तन घडेल.
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफीचा सर्वात मोठा निर्णय झाला. सांगली जिल्ह्यात ८२ हजार शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली. पुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १३६ कोटी रुपयांची मदत दिली गेली. पूरग्रस्त गावांना यांत्रिक बोटिंचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील ५०० पेक्षा जास्त शाळांना आदर्श शाळा योजनेत सामील करून घेतले. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे जगभरात कौतुक झाले. त्यानंतर राज्यातील प्रमुख पक्ष फोडण्याचे कृत्य करण्यात आले. तरीही जनता आपल्या मागे ठामपणे उभी असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.