नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागपूर लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून भारतीय जनता पक्षाकडून वारंवार नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते. त्याचीच प्रचिती आज नागपूरकरांनी मतदानाच्या दिवशी अनुभवली. मतदान केंद्राबाहेरच भाजपच्या बुथमधून लोकांचे नाव मतदार यादीत शोधून देण्याच्या बहाण्याने त्यांच्या हाती पावती देण्यात येत होती. या पावतीवर भाजपच्या कमळ चिन्ह छापून होते. यासह भाजप उमेदवार नितीन गडकरी यांचा छायाचित्रही छापून होता. या पावतीवर कहो “दिल से नितीनजी फिर से” असे लिहीलेले होते असा आरोप करत काँग्रसेने नागपुरकरांनी खरचं निष्पक्ष निवडणुका अनुभवल्या का? असा प्रश्न केला आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, या संदर्भातील एक व्हिडीओही शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच या ठिकाणी लोकांचे खासगी सॉफ्टवेअरची मदत घेत मतदारांचे नंबर घेऊन त्यांना व्हॅट्सअप आणि टेक्स्ट मॅसेज द्वारेही प्रचारबंदी असताना मॅसेज पाठविण्यात येत होते. अनेक मतदान केंद्राबाहेर भाजपने आपल्या पक्षाचे चिन्ह असलेले पंडालही उभारले होते, हे विशेष. हा सर्व प्रकार सुरु असताना मतदान केंद्राबाहेरील पोलिस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी मात्र बघ्याच्या भूमिकेत हे सर्व बघत होते. या संदर्भात इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
उत्तर नागपुरात “स्लो वोटिंग
उत्तर नागपुरात अनेक मतदान केंद्रांवर भर उन्हात मतदार रांगेत लागलेले असतानाही खूप हळू हळू वोटींग सुरु असल्याची तक्रार मिळताच काँग्रेस प्रतिनीधींनी पडताळणी केली असता बुथ क्रमांक 211,216, 343 सह अनेक ठिकाणी स्लो वोटिंग सुरु होती.
मतदार यादीतून अनेकांची नावे डिलीट
जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका शहरातील हजारो मतदारांना बसला आहे. शहरातील अनेक मतदान केंद्रावर मतदान कार्ड असणाऱ्यांची नावेच मतदार यादीतून प्रशासनाने डिलीट केल्याने हजारो मतदार मतदानापासून वंचित राहीले. उमेदवारांच्या प्रतिनीधींना दिलेल्या मतदार यादीत या मतदारांची नावे होती. मात्र मतदान केंद्रावर या मतदारांच्या नावासमोर डिलीटचा शिक्का मारलेला होता, हे विशेष. या संदर्भात इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
अनेकांकडून मतदान करतानाचं शुटींग
सामान्य नागरिकांसाठी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी होती. तसेच मोबाईल बाहेर ठेवा अशा सूचना देण्यात येत होत्या. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर जाताना, यादीवर सही करताना, तसेच मतदान केल्याचे बटन दाबतानाचे आणि VVPAT चे ही शुटींग केलं. त्यामुळे नियम फक्त सामान्यांसाठीच असतो का असा सवालही नागरिकांची उपस्थित केला. यासह अनेक मतदान केंद्राच्या आतमध्ये भाजपचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीने प्रचारही करत होते. असा आरोपही काँग्रेसने केला आहे.