इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय शुक्रवारी पत्रकार परिषद जाहीर केला. या जागेवर तिढा निर्माण झाल्यामुळे माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळेल असे जवळपास निश्चित झाले आहे. पण, शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना की अजय बोरस्ते हा सस्पेंस कायम आहे. उद्या याबाबत निर्णय घोषीत होणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु होती. साताराची जागा राष्ट्रवादीने भाजपाल सोडल्यानंतर नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्याचे निश्चित झाले होते. पण, शिंदे गटाचे विदयमान खासदार या ठिकाणी असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला देऊ नये असा आग्रह सुरु होता. त्यानंतर त्यासाठी अनेक वेळा खासदारांचे शिष्टमंडळ मुंबईला गेले. पण, भुजबळांनी आता माघार घेतल्यामुळेही जागा शिंदे गटाला निश्चित झाली असली तरी उमेदवार कोण हा संभ्रम अद्याप कायम आहे.
नाशिकच्या जागेवर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी इच्छुक उमेदवार असा मथळा टाकून घरोघरी प्रचार पत्रक वाटले आहे. त्याचप्रमाणे मतदार संघात त्यांचा प्रचाराचा एक टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. पण, अशातच नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार कोणचा सस्पेंस कायम आहे.