नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोळसा मंत्रालयाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात १०१२ दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मंत्रालयाने, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विक्रमी कामगिरी करताना, १७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ५०० मेट्रिक टन कोळसा पाठवण्यात यश मिळवले आहे. पावसाळा असूनही पहिल्या सहामाहीच्या २०० दिवसांत ५०० मेट्रिक टन कोळसा पाठवणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे.
वर्षाच्या उत्तरार्धात उत्पादन आणि ते पोहचते करण्याचा दर सामान्यतः पहिल्या सहामाहीपेक्षा जास्त असतो. त्यामुळे यंदा कोळसा पाठवण्याचे प्रमाण एक अब्ज टनांपेक्षा जास्त होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या आर्थिक वर्षात ९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ५०० मेट्रिक टन कोळसा पाठवण्याचे उद्दिष्ट गाठले गेले होते, तर चालू आर्थिक वर्षात हे उद्दिष्ट संबंधित कालावधीच्या २३ दिवस आधी गाठले गेले आहे.
विशेष म्हणजे या ५०० मेट्रिक टन कोळशापैकी ४१६.५७ मेट्रिक टन कोळसा ऊर्जा क्षेत्रासाठी आणि ८४.७७ मेट्रिक टन अ-नियंत्रित क्षेत्रासाठी पाठवण्यात आला होता. उर्जा क्षेत्रातील कोळसा वाहतुक वाढीचा दर वर्षाला ७.२७ टक्के आहे आणि अ-नियंत्रित क्षेत्रात दरसाल ३८.०२ टक्के आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत ८९३.१९ दशलक्ष टन कोळसा पाठवण्यात आला. कोळसा मंत्रालयाच्या या ऐतिहासिक कामगिरीमध्ये कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल), सिंगरेनी कोलीरीज कंपनी लिमिटेड (एससीसीएल) आणि बंदिस्त/व्यावसायिक खाणींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.