नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑनलाईन फोन अॅप सुरू करून देण्याच्या बहाण्याने भामट्याने युझर आयडी आणि पासवर्डचा वापर करून महिलेच्या बँक खात्यातील रक्कमेवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिलेच्या बँक खात्यातून ९ हजार ५०० रूपये परस्पर काढण्यात आले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उषा अशोक बोडके (रा.सुमन पेट्रोलपंपाजवळ राजीवनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बोडके यांच्याशी गेल्या ३१ जानेवारी रोजी दिनेश वर्मा नामक इसमाने संपर्क साधला होता. यावेळी त्याने ऑनलाईन फोन अॅप सुरू करून देण्याचे आमिष दाखविल्याने बोडके यांनी बँकेची गोपनिय माहिती दिल्याने ही फसवणुक झाली.
भामट्याने बँकेच्या युझर आयडी आणि पासवर्डचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतली. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.