इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील मारुती मंदिरात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते नारळ वाढवून आजपासून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. शरद पवार आपल्या पहिल्या निवडणूकीपासून याच मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करतात. गेली अनेक निवडणूका हा शिरस्ता कायम आहे. बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील सभेतून पवार यांनी खा. सुळे यांच्या प्रचाराचा प्रारंभ केला. भाषणाच्या सुरुवातीलाच कन्हेरी गावचा उल्लेख करत त्यांनी गावकऱ्यांची मने जिंकली.
या वेळी त्यांनी सभास्थळी उपस्थित एका ज्येष्ठ कार्यकर्त्याला नावानिशी ओळखले, तुम्ही गुरुजी आहात का ? असे पांडुरंग झगडे यांना विचारून त्यांचे वय विचारले. त्यांनी ९४ असे असल्याचे सांगताच, आपण माझ्यापेक्षा वडील आहात असे पवार म्हणाले.
यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, सतीश मामा खोमणे,राजेंद्र दादा पवार, श्रीनिवासदादा पवार, बारामती तालुकाध्यक्ष एस. एन. बापू, संदीप गुजर, वनिता बनकर, यांच्यासह पवार कुटुंबीय, स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, नेते , कार्यकर्ते आणि पवार कुटुंबावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते