नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीचा ताकद अधिक वाढवणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. आज मुंबई येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, होळीच्या दिवशी अजितदादाचा निरोप आला म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली त्यांनी दिल्लीचा निरोप दिला गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीमध्ये नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली तेव्हा अजितदादांनी समीर भुजबळ यांच्यासाठी जागा मागितली परंतु अमित शहा यांनी माझं नाव सांगितले. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी मी एक दिवसाची वेळ मागितली. मात्र दुसऱ्या दिवशीही माझंच नाव फायनल झाल्याचं मला सांगण्यात आलं. त्यामुळे मी नाशिकला येऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मते जाणून घेतली. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, नाशिक मध्ये माझी विविध पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. नाशिकच्या विकासासाठी मराठा, दलीत, ब्राम्हण, ओबीसी यासह सर्व समाजाने नाशिकच्या विकासासाठी पाठिंबा दिला. त्यानुसार आम्ही तयारी करण्यास सुरुवात केली. मात्र तीन आठवड्याचा वेळ होऊन उमेदवारी जाहीर झाली नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार देखील सुरू झाला असून तीन आठवड्यापासून ते मतदारसंघात फिरत असून त्यांचा प्रचार पुढे गेला आहे. अधिक उशीर होत असल्याने महायुतीच नुकसान होऊ शकत त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्वांच्या मनातील संदिग्धता दूर करण्यासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे स्पष्ट केले.
तसेच मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी सुचवलं होत. त्यांनी त्यांनी दाखवलेल्या आग्रहाबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच नाशिकच्या विकासाकडे बघून मराठा समाजासह विविध समाज बांधवांनी विविध पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला जो पाठिंबा दिला त्यांचेही आभार मानतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.