नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एका गुंतवणुकदारास नऊ लाख रूपयांना गंडा घातल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेने जप्त केलेली प्रॉपट्री अल्पदरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून दलालीपोटी ही रक्कम उकळण्यात आली आहे. सहा – सात महिने उलटूनही प्रॉपर्टी न मिळाल्याने गुंतवणुकदाराने पोलीसात धाव घेतली आहे.
याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहूल वासूदेव भडांगे (रा.एकदंत अपा.तांबेमळा शांतीनगर पंचवटी) व सोमनाथ विठ्ठल धात्रक (रा.हमालवाडी पेठरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अशोक अप्पाजी लहामगे (रा.श्रमिकनगर,सातपूर) यानी फिर्याद दिली आहे. लहामगे यांची भामट्यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात भेट घेतली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्र बँकेत मोठ्या ओळखी असून बँकेने जप्त केलेल्या मालमत्तांचा लवकरच लिलाव होणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी गुंतवणुक केल्यास अल्पदरात घर व अन्य प्रॉपर्टी मिळवून देण्याची ग्वाही दिली.
त्यामुळे कोट्यावधींची प्रॉपट्री लाखोत मिळत असल्याने लहामगे यांचा विश्वास बसला. या कामाच्या मोबदल्यात नऊ लाख रूपयांची दलाली देण्याचे ठरले. त्यानुसार लहामगे यांनी दोघांना ठरलेली रोकड दिली. मात्र सहा सात महिने उलटूनही लिलावात सहभागी होता आले नाही. लहामगे यांनी चौकशी केली असता बँकेकडून सध्या कुठल्याही प्रॉपर्टीचा लिलाव होणार नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.