इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
टोकियोः जगभरातील नामांकित कंपन्यांमध्ये कामगार कपातीचे सत्र सुरु आहे. याअगोदर अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांनी या वर्षी कामगार कपात केली. आता या यादीत जपानी कंपनी तोशिबा जोडली गेली आहे. ही कंपनी पाच हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे.
निक्की एशियाच्या रिपोर्टनुसार कंपनीच्या या कर्मचारी कपात योजनेचा देशांतर्गत बाजारावर परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीने कामावरून कमी करण्याची योजना आखलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जपानमधील एकूण कर्मचाऱ्यांच्या सात टक्के इतकी आहे. २०१५ मध्येही मोठी या कंपनीने कामगार कपात केली होती.
या वेळी, कंपनीच्या मुख्यालयात बॅक-ऑफिसच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांवर कपातीचे संकट आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीतून स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय मिळणार आहे. अहवालानुसार, या छाटणी योजनेमुळे कंपनीला विशेष सेवानिवृत्ती लाभ आणि आउटप्लेसमेंट सेवांवर सुमारे शंभर बिलियन येन (६४६ मिलियन डॅालर) खर्च येणार आहे.