नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असले तरी त्यांच्या अडचणी कमी होतांना दिसत नाही. नांदेड लोकसभा मतदार संघात मुखेड तालुक्यांतील जांब येथे प्रचार सभेत मराठा समाजाच्या आंदोलकांनी गोंधळ घातला. त्यानंतर त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर मराठा आरक्षणा संदर्भात चव्हाण यांना जाब विचारला. त्यामुळे काही वेळ चव्हाण यांनी आपले भाषण थांबवले. याअगोदरही त्यांची गाडी अडवण्यात आल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर चव्हाण यांनी सांगितले की, जांब, ता. मुखेड, जि. नांदेड येथे गुरुवारी महायुतीची प्रचारसभा सुरू असतांना सकल मराठा समाजाचे काही बांधव सभेत आले. त्यांचे निवेदन मी स्वीकारावे, अशी त्यांची मागणी होती. सभा संपल्यावर आपण चर्चा करू, अशी विनंती मी त्यांना केली. मात्र, आताच निवेदन स्वीकारावे असा त्यांचा आग्रह असल्याने भाषण थांबवून मी त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर ते निघून गेले व सभा पुन्हा सुरू झाली.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ ही सभा होती. यावेळी आ. तुषार राठोड यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.