इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकी अगोदरच आम आदमी पार्टीच्या नेत्यांना अटक होत असल्यामुळे दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे. आता आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांना ईडीने गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. अटक करण्यापूर्वी त्यांची नऊ तास चौकशी करण्यात आली. या तपासात अमानतुल्लाच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवरून रोख रक्कम जप्त करण्यात आली. अमानतुल्लाच्या जवळच्या नातेवाइकांच्या घरी एक डायरी सापडली. त्यात अमानतुल्ला यांनी देश-विदेशात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचा उल्लेख आहे.
दिल्ली वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी असताना ३२ जणांची बेकायदेशीरपणे भरती केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांनी दिल्ली वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने दिल्या. दिल्ली वक्फ बोर्डाच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही आमदार अमानतुल्ला खान यांच्यावर आहे. दिल्ली वक्फ बोर्डाच्या तत्कालीन ‘सीईओं’नी बेकायदेशीर भरतीचा आरोप केला होता.
अगोदर या प्रकरणात अटक
१२ नोव्हेंबर रोजी ‘ईडी’ने दिल्ली वक्फ बोर्ड प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात तीन आरोपींना अटक केली होती. झिशान हैदर, जावेद इमाम, दाऊद नसीर अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण अमानतुल्ला खान यांच्या जवळचे आहेत. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सप्टेंबर २०२२ मध्ये अमानतुल्ला यांची चौकशी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार ठिकाणी छापे टाकून सुमारे २४ लाखांची रोकड जप्त केली. याशिवाय दोन बेकायदेशीर पिस्तूल सापडले. काडतुसे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर अमानतुल्लाला अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. आता पुन्हा कारवाई करण्यात आली.