वसंतराव जोशी, नाशिक
गेल्या वर्षी उत्तरवाहीनी नर्मदा परिक्रमा विषयी माहिती मिळाली. आणि लगेच निर्णय घेऊन आम्ही जवळजवळ दहा जण उत्तरवाहीनी नर्मदा परिक्रमेसाठी नाशिकहून निघालो. त्यासाठी आधी मी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा विषयी माहिती घेतली. नर्मदेच्या संपूर्ण प्रवाहामध्ये तिचा जवळजवळ दहा किलोमीटरचा प्रवाह हा उत्तर दिशेने वळला आहे. तेथुन पुन्हा ती नेहमीच्या दिशेने मार्गस्थ झाली, या वळण घेतलेल्या नदी मार्गाला आपल्या धर्म ग्रंथात खूप महत्त्व आहे. याचे वर्णन अनेक संदर्भ ग्रंथांत आढळते. म्हणून उत्तरवाहीनी नर्मदा परिक्रमा करण्याचे खूप महत्त्व आहे.
असे वर्णन व माहिती घरात आम्ही नेहमी मागील वर्षापासून चर्चा करत होतो, हे सर्व लहानशा कु. श्रीनीधिने ऐकले व मनाचा निग्रह करून ती आग्रहाने सांगुन २०२४ च्या आमच्या प्रवासात सामील झाली. नाशिक ते तिलकवाडा या ७-३० तासांचा प्रवासात एकदम उत्साहीत होती. आम्ही श्री क्षेत्र तिलकवाडा येथे पोहचलो. ( श्री क्षेत्र तिलकवाडा या ठिकाणी महान योगी व श्री दत्त परंपरेतील अग्रणी व ज्यांची योग्यता श्री दत्त प्रभूंच्या आद्य अनुयायी मध्ये आहे. प्रत्यक्ष भगवान दत्त प्रभु स्वामी महाराजांशी संवाद करत. अशी योग्यता असलेले महान योगी श्री टेंबे स्वामी म्हणजेच श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी या तिलकवाडा येथे आपला ८ वा चातुर्मास संपन्न केला आहे. तसेच या ठिकाणी १७६० च्या दरम्यान समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दक्षिणमुखी मारुतीची स्थापना केलेली आहे. अशा या पवित्र भूमीवर वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या नावाने आश्रम आहे वासुदेव कुटीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या आश्रमात आम्ही पोहोचलो. संध्याकाळची श्री हनुमान आरती , भगवान भोले बाबा आरती,श्री टेंबे स्वामी आरती व समोरील मैदानात हरिपाठ व नर्मदा मैयाची आरती. हे सर्व झाल्यानंतर भोजन प्रसादी घेऊन आम्ही विश्रांती घेतली त्यानंतर आम्ही बरोबर एक वाजता सर्वजण झोपेतून उठून तयारी केली.
त्यावेळी श्रीनिधीला सांगितले की आपल्याला परिक्रमेला जायचे त्याबरोबर ती ताबडतोब उठली व स्वतःचे संपूर्ण आवरून तयार झाली आणि मग आम्ही बरोबर तीन वाजता तिलकवाडा येथून परिक्रमेसाठी नर्मदा मैयाच्या पलीकडील काठावर पोहोचलो. परिक्रमा सुरू केली. देवाच्या नावाचा गजर करत आम्ही अंधारातून मार्ग क्रमण करत नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर जय घोष सुरू होता. या सर्व घटनेत श्रीनीधि आनंदाने सर्वांच्या पुढे चालत होती. कधी माझ्या सोबत, कधी आजी बरोबर, कधी आई-बाबां बरोबर, कधी तिच्या वसुआत्या, विकी काका बरोबर, कधी मामा आजोबा किंवा मामी आजी सोबत तिचा पाई प्रवास सुरू होता. यात जमेची गोष्ट ही की ती आम्हाला सुचना करत असे. अंधार आहे, समोर खोल रस्ता आला, दमले का बसायचे का. इतक्या आपुलकी ने ती बोलत सोबत चालत होती. ती अत्यंत आनंदी व उत्साही होती.
एकदाही तिने जराही म्हटले नाही की थांबा म्हणुन. आणि याचेच सोबत चालणाऱ्या परिक्रमा वासीनां खूप खूप कौतुक वाटायचे. ते जवळ येऊन तिच्या सोबत बोलत, कोणी तिचा पापा घेत, कोणी तिला जवळ घेऊन आनंदाने चौकशी करत. अशा प्रकारे आमची परिक्रमा एका तटाने पुर्ण करुन आम्ही सूर्योदयाच्या आधी संधिप्रकाशात श्री क्षेत्र जुना रामपुरा येथे पोहचलो. तेथुन छोट्या बोटीने पलीकडे उतरलो. तेथे जवळ जवळ बराच प्रवास हा गाव व रेग्युलर रस्ता यावरून करत निघालो. सुर्योदय झाला, तो जसजसा वर येत होता तसतसा आमची वारी पुढे सरकत होती. प्रवासात दोनही तटावर असलेल्या अनेक मंदिरे व साधुसंतांच्या आश्रमाचे दर्शन घेत होतो.
श्रीनीधि सुध्दा खुप उत्साहात प्रवास करत होती. आम्ही तिची काळजी करायचो पण ती आनंद व्यक्त करत पुढे पुढे सर्वांना हरवत प्रवास करत होती. तिचा उत्साह व जोश खरच कौतुकास पात्र आहे. अनेक प्रश्न तीने सोबत असलेल्या प्रत्येकाला विचारले. मला तिने बेसिक प्रश्न विचारला की, ” परिक्रमा म्हणजे काय?”सयावर मला विचार करून तिला उत्तर द्यावे लागले. परिक्रमा म्हणजे आपल्या आराध्य दैवताला किंवा पवित्र मानतात असलेल्या वृक्षाला, ठिकाणाला, गड-पर्वताला, किंवा असे अनेक श्रध्दास्थानांना आपण जी फेरी मारतो त्याला प्रदक्षणा म्हणजेच परिक्रमा म्हणतात. यात एक नियम आहे तो म्हणजे परिक्रमा करताना आपले श्रध्दा स्थान हे आपल्या उजव्या बाजूस असावे
असे अनेक योग्य प्रश्न ती विचारत चर्चा करत असते. रात्री १ वाजेला सर्व मोठ्या परिवारासोबत उठून, आवरुन संपूर्ण २१ कि.मी चा प्रवास तोही रात्री व तेही अत्यंत उत्साहाने व आनंदाने करुन ती प्रसन्न मनाने वावरत होती. नर्मदा मैय्या परिक्रमा पूर्ण झाल्यावर अनेक परिक्रमा वासीनीं तिला बसवून तिचे कुमारी पूजन केले. सोबत असलेल्या सर्वांनी तिचा आशिर्वाद घेतला. “” श्री वासुदेव कुटीर “” मध्ये सुध्दा श्री हेमंत जोशी आबांनी तिचे पुजन करुन तिला शालेय साहित्य दिले. श्री हेमंत जोशी आबा हे मुंबई वासी आहेत, पण वासुदेव कुटीर येथे मुख्य सदस्य म्हणून सक्रिय असतात.श्री वासुदेव कुटीर येथे कधीही, काहीही उत्सव असला की ते मुंबईहून लगेच येतात सेवा देतात. या चैत्र महिन्यात ते तिलकवाडा येथे स्थाईक असतात संकल्प सांगणारे पुरोहित यांनी सुध्दा तिचे पूजन केले. सर्व परिक्रमा वासी खुप कौतुक करून तिला भेटत होते श्रीनीधि सुध्दा समर्पक उत्तरे देत होती. खरच श्रीनीधिने केलेल्या या परिक्रमा सत्संगामुळे आम्हा सर्वांना तिचा दृढनिश्चय, उत्सुकता, अभ्यास प्रकृती, उत्साह व ध्येय साध्य करण्याची मनशा याचा अनुभव आला. येवढेच नव्हे तर ती पुढील प्रत्येक वर्षाचे मनसुबे व्यक्त करत होती. हे बघून आम्हाला आनंद झाला. अशा प्रकारे कु. श्रीनीधिची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली व तिच्या बद्दल चा आपलेपणा वाढीस लागला.