जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रनिर्मिती कार्यात युवकांची भूमिका अनन्यसाधारण आहे. त्यामुळे लोकशाही राष्ट्रात मतदान ही गोष्ट मूलभूत आहे. त्यामुळे युवा वर्गाने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन सारासार विवेकबुद्धीचा सुयोग्य वापर करून मतदान जरूर करावे. हा विचार करायला प्रेरित करणारी गोष्ट म्हणजे ‘ ताबुला रसा ‘ ही संकल्पना असल्याचे सांगून आपले आप्तेष्ट मित्रमंडळी, नातेवाईक यांना देखील मतदान करण्यास उद्युक्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
आज कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘ताबुला रसा’ उपक्रमाप्रसंगी विदयार्थ्यांना केले.
काय आहे ‘ ताबुला रसा ‘?
अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर ‘ताबुला रसा’ म्हणजे कोरी पाटी… कोणतीही व्यक्ति जन्माला येताना तशी कोरी असते. नंतर सामाजिक वातावरणात, सभोवतालातून अनेक अनुभवातून शिकते, विचार करते. त्यातून त्याची एक धारणा निर्माण होते. ती विचार करण्याची कल्पना म्हणजे ‘ ताबुला रसा ‘ यात नवमतदाराला पांढरा स्वच्छ कागद देऊन तुमच्या डोक्यात त्यावेळी काय असेल ते लिहायला सांगितले जाते. मग तो त्यावेळी विचार करायला प्रेरित होतो. त्यावेळी त्याच्या मनात वैचारिक मंथन होतं त्यातून तो लिहतो. उदा. लोकशाही, स्वातंत्र्य, किंवा चित्र काढेल किंवा डोक्यात असेल ते विचार व्यक्त करू शकेल. त्याक्षणी त्याच्या मनात जो वैचारिक अविष्कार होईल, त्याला ‘स्वातंत्र्य’ म्हटले जाते ….. तेच स्वातंत्र्य तुम्हाला मतदान करतांना लोकशाहीने बहाल केले आहे.मतदान करण्याच्या बॉक्स मध्ये फक्त तुम्ही असता त्यावेळी तुम्ही काही वेळासाठी विचार करता…त्यातून जे मत निर्माण होतं ते अमूल्य आहे. असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘ताबुला रसा ‘ संकल्पना सांगताना स्पष्ट केले.
यावेळी सर्वांना कोरे कागद देऊन वरील संकल्पने प्रमाणे प्रात्यक्षिक करायला सांगितले. त्यात विद्यार्थ्यांना युमच्या मनात येईल ते निबंध,चित्र, व्यंगचित्र,लेख, कविता यांच्या माध्यमातून व्यक्त व्हायला सांगितले. यातून एकच संदेश अभिप्रेत आहे की, लोकशाही मध्ये तुम्हाला विचार करण्याचे अनमोल स्वातंत्र्य आहे. त्या लोकशाहीचा आत्मा मतदान आहे. त्यामुळे तुम्ही तर कराच पण तुमच्या घरच्यांना, पाहुण्या- रावळ्यांना सांगा पण सांगा, मतदान कराच असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मतदानाचा दिवस सुटीचा दिवस न मानता देशाप्रती कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.तसेच देशात युवकांचा टक्का मोठा असल्याने युवकांना मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे मतदान अवश्य करावे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी श्री.विनोद पाटील (कुलसचिव), श्री. अनिकेत पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी), श्री.योगेश पाटील (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी) प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे (संचालक विद्यार्थी विकास), डॉ. अतुल इंगळे व प्रा.श्री. राहुल वराडे (सहाय्यक जिल्हा स्वीप नोडल अधिकारी),प्रा.डॉ.गोगाडे यांचेसह मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.