नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांचा समावेश असलेल्या आयोगाने आज दुपारी 12 वाजता सार्वत्रिक निवडणुका 2024 चा पहिला टप्पा सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या तयारीला अंतिम स्वरूप दिले. मतदानाचे उर्वरित सहा टप्पे 1 जूनपर्यंत सुरू राहतील. सुमारे 97 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.
आता ही वेळ मतदारांनी पुढे येण्याची आहे, असे आयोगाचे मत आहे. मतदारांनी आपल्या घरातून बाहेर पडावे, मतदान केंद्रांवर जावे आणि अतिशय जबाबदारी आणि अभिमानाच्या भावनेतून मतदान करावे असे कळकळीचे आवाहन आयोगाने केले आहे. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील संदेशात सीईसी राजीव कुमार यांनी सर्व मतदारांना न चुकता मतदान करण्याचे आवाहन केले. सीईसी राजीव कुमार यांचा संदेश येथे ऐका –
पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये
1.सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. म्हणजेच, 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 102 संसदीय मतदारसंघांसाठी (सामान्य- 73; एस टी – 11; एस सी -18) आणि अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 92 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. ही सर्व टप्प्यांमधली सर्वाधिक मतदारसंघ संख्या आहे. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजता संपेल. (मतदान बंद होण्याची वेळ प्रत्येक मतदारसंघानुसार वेगळी असू शकते. )
2.या टप्प्यात 18 लाखांहून अधिक मतदान अधिकारी 1.87 लाख मतदान केंद्रांवर 16.63 कोटी मतदारांचे स्वागत करतील.
3.मतदारांमध्ये 8.4 कोटी पुरुष, 8.23 कोटी महिला आणि 11,371 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
4.35.67 लाख मतदारांनी प्रथमच मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. याव्यतिरिक्त, 20-29 वयोगटातील 3.51 कोटी तरुण मतदार आहेत.
5.निवडणुकीच्या रिंगणात 1625 उमेदवार (पुरुष – 1491; महिला – 134) आहेत.
6.शांतता आणि मतदानाचे पावित्र्य राखण्यासाठी मतदान प्रक्रिया आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी 41 हेलिकॉप्टर, 84 विशेष रेल्वेगाड्या आणि जवळपास 1 लाख वाहने तैनात करण्यात आली आहेत.
शांतता आणि पावित्र्य सुनिश्चितीसाठी
7.निवडणुका शांततापूर्ण आणि सुरळीत पार पाडाव्यात यासाठी आयोगाने अनेक महत्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण व्हावी यासाठी केंद्रीय दलाच्या पुरेशा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
8.सर्व मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक तैनात केले असून 50% पेक्षा जास्त मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाईल.
9.मतदानाच्या काही दिवस आधीच 361 निरीक्षक (127 सामान्य निरीक्षक, 67 पोलीस निरीक्षक, 167 व्यय निरीक्षक) त्यांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत. अत्युच्च दक्षता घेण्याच्या कामी हे सर्व आयोगाचे डोळे आणि कान म्हणून कामगिरी बजावतात. याव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत.
10.एकूण 4627 भरारी पथके, 5208 सांख्यिकी देखरेख पथके, 2028 व्हिडिओ देखरेख पथके आणि 1255 व्हिडिओ निरीक्षण पथके 24 तास पाळत ठेवत आहेत जेणेकरून मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन दाखवण्याचे कृत्य काटेकोरपणे आणि त्वरीत निदर्शनाला आणता येईल.
11.एकूण 1374 आंतरराज्यीय आणि 162 आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके दारू, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तूंच्या कोणत्याही अवैध ओघावर करडी नजर ठेवत आहेत. सागरी आणि हवाई मार्गांवर देखील कडक पाळत ठेवण्यात आली आहे.
मतदारांसाठी सुरक्षा आणि आधार
12.पहिल्या टप्प्यातील 102 मतदारसंघांमध्ये 85 वर्षांहून अधिक वयोगटातील 14.14 लाखांहून अधिक नोंदणीकृत मतदार आणि 13.89 लाख दिव्यांग मतदार आहेत ज्यांना त्यांच्या घरून शांतपणे मतदान करण्याचा पर्याय प्रदान करण्यात आला आहे. या पर्यायी गृह मतदान पद्धतीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून आधीच मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
13.मतदान करण्यासाठी 85 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या तसेच दिव्यांग मतदारांनी मतदान केंद्रांवर येण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना ने-आण सुविधा, मतदान चिन्हे, ब्रेल लिपीतील चिन्हे, स्वयंसेवक इत्यादी सोयी पुरवण्यात येतील. दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाच्या सक्षम अॅपच्या माध्यमातून व्हीलचेयरची सुविधा देखील घेता येईल.
14.वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसह देशातील प्रत्येक मतदाराला सुलभतेने मतदान करता यावे म्हणून पाणी, निवारा, शौचालये, उतार, स्वयंसेवक, व्हीलचेयर्स आणि वीज यांसारख्या किमान सोयींची व्यवस्था असेल याची खात्री करून घेण्यात आली आहे.
15.देशातील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक संकल्पनांसह आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात येत आहेत. यातील 5000 हून अधिक मतदान केंद्रांचे व्यवस्थापन तसेच सुरक्षा व्यवस्था संपूर्णपणे महिलांतर्फे करण्यात येईल आणि 1000 हून अधिक मतदान केंद्रांचे संचालन दिव्यांग व्यक्तींद्वारे करण्यात येईल.
16.सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदार माहिती स्लीप्सचे वितरण करण्यात आले असून या स्लीप्स सुविधात्मक उपाययोजना म्हणून काम करण्यासोबतच निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदानासाठी येण्याचे आणि मतदान करण्यासाठीचे आमंत्रण म्हणून देखील कार्य करतात.
17.मतदारांना आपापल्या मतदान केंद्रांचे तपशील तसेच मतदानाच्या तारखा पुढील लिंकद्वारे तपासून घेता येतील: https://electoralsearch.eci.gov.in/
18.मतदान ओळखपत्रासोबतच (ईपीआयसी) मतदान केंद्रांच्या ठिकाणी ओळख पडताळणीसाठी निवडणूक आयोगाने आणखी 12 पर्यायी दस्तावेज वापरण्याची परवानगी दिली आहे. जर मतदार यादीत मतदात्याची नोंदणी झाली असेल तर या पैकी कोणतेही दस्तावेज सादर करून मतदान करता येईल.