पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे असतात त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही. सौ.सुनेत्रा पवार आणि अजित पवार बारामतीचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहिले असून ते सत्यात उतरवण्यासाठी सुनेत्रा पवार यांना निवडून द्यावे लागेल असे निक्षून सांगितले.
बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीतर्फे सुनेत्रा अजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यावेळेस ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, तीन उमेदवारांचे फॉर्म भरायला महाविकास आघाडीकडे आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे. त्या तुलनेत आपला एक फॉर्म भरायला एवढी प्रचंड जनता येथे आली आहे, ही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कामाची पोचपावती असून बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सौ.सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. बारामतीमध्ये यंदा परिवर्तन घडणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना बारामतीमध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आहे. बारामतीकरांनी परिवर्तन घडवण्याचा निर्धार आणि संकल्प केला असून ही लढाई ऐतिहासिक असली तरी ती वैयक्तिक नाही. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. त्यामुळे बारामतीत परिवर्तन घडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, महायुतीच्या उमेदवार सौ.सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई, रासप आणि मनसे महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.