सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्गावर सिन्नर जवळील खंबाळे शिवार येथे गुरुवारी सकाळी स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये २ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडी महामार्गावरील साईड बॅरियरला तोडून चारीमध्ये जाऊन गाडी पलटी झाली.
ही स्कॉर्पिओ गाडी छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे येत होती. यातील सर्व प्रवासी हे छत्रपती संभाजीनगरच्या करवड गावतील आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात बाजीराव एकनाथ गांगुर्डे यांचा जागीच मृत्यू झाला. तर निशा रामकिसन गडगूळ (२०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये वाहन चालक परमेश्वर पुंडलिक गडगूळ (२१), मिनाबाई रामकिसन गडगूळ (४६) हे जखमी असून रामकिसन गडगूळ यांना किरकोळ मार लागलेला आहे.