इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अखेर रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण, त्यांना या ठिकाणी राणे यांनी काटशह देत उमेदवारी मिळवली आहे. आता या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत व भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यात चुरशीची लढत होईल.
२०१४ व २०२९ च्या दोन्ही निवडणुकीत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांचा पराभव केला होता. पण, आता शिवसेनेत झालेली फुट व त्यानंतर भाजपचे वाढलेले वर्चस्वामुळे या मतदार संघात ही लढत शिवसेना ठाकरे गटासाठी सोपी नाही.
ही उमेदवारी जाहीर होताच नारायण राणे यांनी सपत्नीक ग्रामदेवतेचे दर्शन घेतले. कुठलंही काम सुरु करायचं असेल किंवा निवडणूक लढवायची असेल तर मी ग्रामदेवतेचे दर्शन घेतो असे राणे यांनी सांगितले. मला उमेदवार मिळणार हे अगोदरच माहित होते. त्यामुळे मी प्रचाराला सुरुवात केली आहे. किरण सामंत हे नाराज नाही या निवडणुकीत आम्ही एकत्र काम करु असेही त्यांनी सांगितले.