इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः मुंबई पोलिसांना अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात यश आल्यानंतर आणखी एका संशयिताला पोलिसांनी हरियाणातून अटक केली आहे. हा संशयित व्यक्ती हल्ल्याच्या आधी आणि त्यानंतर शूटर्सच्या संपर्कात होता. विशेष म्हणजे अगोदर ज्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांनी सुध्दा धक्कादायक माहिती दिली आहे.
विक्की गुप्ता आणि सागर पाल यांनी पोलिसांनी सांगितले की, अनमोल बिश्नोईने त्यांना ही सुपारी दिली होती. त्यात सलमाच्या घरावर दोन मॅगजीन म्हणजेच जवळपास १० गोळ्या झाडण्यास सांगितले होते. या मोबदल्यात काम करण्याआधी १ लाख आणि काम झाल्यानंतर ३ लाख रुपये देण्याचे ठरले होते.
१४ एप्रिलला पहाटे ४.५५ वाजता दोघांनी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चार राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी सलमानच्या घरात गेली. गोळीबाराच्या वेळी सलमान घरातच होता. गोळीबारानंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री उशिरा गुजरातमधील भुज येथे अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना १० दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यानंतर आता आणखी एक आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.