इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ट्रॅफिकचे नियम कडक असले तरी ते मोडण्यात काही जणांना आनंद मिळतो. स-हास हे नियम मोडणा-यांची संख्याही मोठी आहे. पण, बंगळुरुतील एका दुचाकी महिला चालकाला २७० ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख ३६ हजाराचा दंड ठोठावल्याच्या बातमीने वाहतूक नियम मोडण्यांना चांगलीच धडकी भरली आहे. या नियम मोडणा-या महिलेची अॅक्टिव्हा स्कूटरही ट्रॅफिक पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष म्हणजे तिच्या या अॅक्टीव्हाच्या किंमतीपेक्षा दंड जास्त आहे.
या महिलेने हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणे, दोन पेक्षा अधिक सीट बसवणे, रस्त्याच्या चुकीच्या बाजूने दुचाकी चालवणे, दुचाकी चालवतांना मोबाईलचा वापर करणे, ट्रॅफिक सिग्नल तोडून पुढे जाणे अशा ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने हे वृत्त दिल्यानंतर या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. पूर्वी नियम मोडले व पोलिसांनी पकडले तर दंड बसत होता. आता पोलिस नसले तरी कॅमेरे काही शहरात ठिकठिकाणी आहे. त्यामुळे नियम मोडले की दंड आपोआप बसतो. त्यामुळे त्यातून आता सुटका होत नाही. बंगळुरुतील महिलांनेही असेच नियम मोडले. जेव्हा तीच्यावर कारवाई केली तेव्हा तीने २७० वेळा नियम मोडल्याचे समोर आले.