नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करणे, तृतीयपंथीयांसाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणे, त्याचप्रमाणे शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना इत्यादीबाबतची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
ही हेल्पलाईन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नाशिक कार्यालयात असणार आहे. या हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक 0253-2975800 हा असून तो सुरु करण्यात आला आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नाशिक देविदास नांदगावकर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारींच्या निराकरणासाठी त्यांनी या हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकाचा उपयोग करून अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक सामाजिक न्याय भवन, नाशिक पुणे रोड, नाशिक कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.